• खासदार ईराण्णा कडाडी यांची माहिती

बेळगाव / प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानाअंतर्गत राबवण्यात आलेल्या विविध जलसंधारण उपक्रमांमुळे बेळगाव जिल्ह्यातील भूजल पातळीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या १,६७६ चेक डॅम्ससह सुमारे १.१ लाख जलसंधारणाच्या कामांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याची माहिती राज्यसभेचे खासदार ईराण्णा कडाडी यांनी दिली. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी यासंदर्भात लेखी उत्तर दिले आहे.

गेल्या दहा वर्षांतील सरासरी आकडेवारीचा आढावा घेतल्यास जिल्ह्यातील सुमारे ८१ टक्के विहिरींच्या पाणी पातळीत सकारात्मक बदल झाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सुमारे ९७ टक्के विहिरींमध्ये ० ते १० मीटर खोलीवरच पाणी उपलब्ध होत असून ही अत्यंत दिलासादायक बाब असल्याचे खासदार कडाडी यांनी सांगितले. जलसंधारणाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे भूजल व्यवस्थापनातही लक्षणीय सुधारणा झाल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्ह्यातील ‘सुरक्षित’ तालुक्यांचे प्रमाण २०१७ मधील ४० टक्क्यांवरून २०२५ मध्ये ५३.३ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. तर अतिवापराच्या श्रेणीत असलेल्या तालुक्यांचे प्रमाण ३० टक्क्यांवरून १३.३ टक्क्यांपर्यंत घटले असून सध्या केवळ बैलहोंगल आणि सौंदत्ती हे दोनच तालुके या श्रेणीत आहेत. अटल भूजल योजनेअंतर्गत अथणी आणि रामदुर्ग तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींमध्ये १,५३६ बोअरवेल पुनर्भरण युनिट्स उभारण्यात आले असून त्यापैकी ३१ ग्रामपंचायतींमध्ये पाण्याची पातळी वाढल्याचे दिसून आले आहे.

तसेच ‘पर ड्रॉप मोर क्रॉप’ योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात आहे. राज्य सरकारच्या शाश्वत पीक व्यवस्थापन योजनेअंतर्गत बेळगाव जिल्ह्यातील सुमारे १,००० हेक्टर ऊस क्षेत्रात नवीन सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिल्याचे खासदार कडाडी यांनी सांगितले.