- महाराष्ट्रातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह सात जण अटकेत
- बनावट नोटांच्या माध्यमातून नागरिकांची लूट
बेळगाव / प्रतिनिधी
पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा गोकाक शहरात पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत महाराष्ट्र पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांसह एकूण सात जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून बनावट नोटा तयार करण्याचे साहित्य, रोख रक्कम व मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकाकमधील श्रीनगर परिसरातील एका घरात पैसे चारपट करून देण्याच्या नावाखाली फसवणूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गोकाक शहर पोलिसांनी तत्काळ छापा टाकला. या कारवाईत परशुराम बडकरी, इम्रान जुनेदी, जयश्री कांबळे, मनीषा गायकवाड, उज्ज्वला बिलाने तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचारी अनंत नरवाडे व दिलदार शेख यांना अटक करण्यात आली. आरोपी पांढऱ्या कागदावर काळा रंग लावून तो खऱ्या नोटांप्रमाणे भासवून लोकांना पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक रामगोंडा बसरगी, डीवायएसपी रवी नाईकोडी आणि सीपीआय सुरेशबाबू आर. बी. यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. गोकाक शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय किरण मोहिते व त्यांच्या पथकाने आरोपींना जेरबंद करत त्यांच्या ताब्यातील नोटा तयार करण्याचे मशीन, रोख रक्कम व मोबाईल जप्त केले आहेत. या प्रकरणी गोकाक शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय निखिल कांबळे करत आहेत. तसेच उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कारवाईत सहभागी पोलीस पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.








