• एप्रिलमध्ये मतदान ; ४ मे रोजी निकाल

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करताच राजकीय वातावरण तापले आहे. आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी रविवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळ या राज्यांतील निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला. या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल ४ मे रोजी घोषित करण्यात येणार आहे.

घोषित कार्यक्रमानुसार, पश्चिम बंगालमधील २९४ विधानसभा मतदारसंघांसाठी दोन टप्प्यांत २३ आणि २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या राज्यात सुमारे ६.४४ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर तामिळनाडूतील २३४ मतदारसंघांसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून सुमारे ४.६७ कोटी मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.

आसाममधील १२६, केरळमधील १४० आणि पुद्दुचेरीतील ३० विधानसभा मतदारसंघांसाठी ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. या तीन राज्यांमध्ये अनुक्रमे सुमारे २.५ कोटी, २.७ कोटी आणि ४.४४ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पाचही राज्यांतील एकूण ८२४ विधानसभा मतदारसंघांसाठी सुमारे १७.४ कोटी मतदार मतदान करणार आहेत.

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पाच राज्यांमध्ये सुमारे २.१९ लाख मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी जवळपास २५ लाख निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत राहणार असून सुमारे ८.५ लाख सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी १,४४४ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.