बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरात बेकायदेशीर शस्त्रे बाळगून सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक मोहीम हाती घेतली आहे. तलवारीसारखी घातक शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या सशस्त्र आरोपींमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर लगाम घालण्यासाठी विशेष कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत संशयितांवर नजर ठेवत छापे टाकून शस्त्रे जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अलीकडेच कानबर्गी परिसरातील रहिवासी गंगाराम कुल्लनवार याला सार्वजनिक ठिकाणी तलवार घेऊन फिरताना माळमारुती पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडील तलवार जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या एका महिन्यात केवळ माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीतच अशा प्रकारची सात प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर संपूर्ण शहरात एकूण ३५ गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. अलीकडील चाकू हल्ल्यांसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून संशयितांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. सार्वजनिक सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत बेकायदेशीर शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या सशस्त्र आरोपींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.








