- रोख रकमेसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा समावेश
- निधी मंदिर विकासासाठी वापरणार
सौंदत्ती / वार्ताहर
बेळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक श्री रेणुका यल्लम्मा मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या देणगीने यंदा विक्रमी पातळी गाठली आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेली दानपेटी मोजणी पूर्ण झाली असून देवीच्या चरणी एकूण ३ कोटी ७ लाख रुपयांचे रोख दान तसेच सोन्या-चांदीचे दागिने जमा झाल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली.
सौंदत्ती तालुक्यातील यल्लम्मा डोंगरावर असलेल्या या मंदिरात दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. ९ ते १२ मार्चदरम्यान पार पडलेल्या दानपेटी मोजणीमध्ये भाविकांकडून मोठ्या प्रमाणात देणगी अर्पण करण्यात आली. गेल्या आठवड्यातच एकदा मोजणी पार पडली असतानाही या फेरीतही लक्षणीय रक्कम जमा झाल्याचे दिसून आले.
दानपेटीत जमा झालेल्या देणगीपैकी २ कोटी ७८ लाख रुपये रोख रक्कम आहे. याशिवाय सुमारे १०० ग्रॅम सोन्याचे दागिने (सुमारे १६.१६ लाख रुपये किंमत) तसेच ४ किलो ५४७ ग्रॅम चांदीचे अलंकार (सुमारे १२.३५ लाख रुपये किंमत) भाविकांनी अर्पण केले आहेत. मोजणी प्रक्रियेत मंदिर प्रशासनातील कर्मचाऱ्यांसह स्थानिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत पारदर्शकपणे काम पूर्ण केले.
मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या वर्षागणिक वाढत असून जमा झालेला निधी मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी वापरण्यात येणार आहे. विशेषतः पिण्याच्या पाण्याची सोय, भाविकांसाठी निवास व्यवस्था, स्वच्छतागृहे तसेच मंदिर परिसराचे सुशोभीकरण यांसारख्या पायाभूत सुविधांसाठी या निधीचा उपयोग केला जाणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली.








