- उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राज्यात ८ वा क्रमांक
बेळगाव / प्रतिनिधी
जन्मापासून दृष्टिहीन असतानाही जिद्द, कठोर परिश्रम आणि तंत्रज्ञानाच्या मदतीच्या बळावर बेळगाव महापालिकेचे एसडीए सुमित मनोहर मोतेकर यांनी केएएस परीक्षेत राज्यात ८ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे बेळगाव शहरासह संपूर्ण राज्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
गोकाक येथील रहिवासी असलेले सुमित मोतेकर सध्या बेळगाव महापालिकेत वरिष्ठ लिपिक (एसडीए) म्हणून कार्यरत आहेत. जन्मापासूनच दृष्टी नसतानाही त्यांनी शिक्षणात सातत्य ठेवत २०२१ पासून महापालिकेत सेवा बजावण्यास सुरुवात केली. नोकरी सांभाळत असतानाच केएएस अधिकारी होण्याचे ध्येय त्यांनी मनाशी पक्के केले होते.
दिवसभर महापालिकेतील कामकाज आणि रात्री अभ्यास अशी त्यांची दिनचर्या होती. वाचनासाठी डोळे नसले तरी आधुनिक तंत्रज्ञानाने त्यांना नवी दिशा दिली. बोलणाऱ्या लॅपटॉपच्या साहाय्याने त्यांनी अभ्यास सुरू ठेवला. पुस्तके ऐकून, टिपणे काढून आणि सातत्यपूर्ण अभ्यास करत त्यांनी ज्ञानसंपादन केले. शारीरिक अडचणींवर मात करत त्यांनी हे यश मिळवले.
आपल्या यशाबद्दल बोलताना सुमित मोतेकर म्हणाले की, तंत्रज्ञानामुळे आज अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होत आहेत. दृष्टिहीन असले तरी बोलणाऱ्या लॅपटॉपच्या मदतीने अभ्यास करून त्यांनी हे यश मिळवले. केएएस किंवा आयएएससारख्या स्पर्धा परीक्षांसाठी अंधत्व किंवा शारीरिक अडचण अडथळा ठरत नाही. कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर कोणतीही गोष्ट साध्य करता येते, असा संदेश त्यांनी दिला.
सहाय्यक कार्यकारी अभियंता हनुमंत कलादगी यांनी सुमित यांच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत सांगितले की, अंधत्वाला आव्हान मानत त्यांनी बेळगाव महापालिकेत एसडीए पद मिळवले आणि त्यानंतरही मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवली. दृष्टिहीन असूनही त्यांनी मिळवलेले हे यश प्रेरणादायी आहे. भविष्यात ते प्रशासनात महत्त्वाची भूमिका निभावतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
केएएस परीक्षेचा निकाल जाहीर होताच सुमित मोतेकर यांनी राज्यात आठवा क्रमांक मिळविल्याची बातमी समोर आली आणि महापालिकेतील सहकारी तसेच विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. अंधत्वामुळे दृष्टी नसली तरी ध्येय गाठण्याची जिद्द आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर सुमित यांनी यशाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.








