- २० टक्के आर्थिक वाटा देण्याचा ठराव
- पारदर्शक अंमलबजावणीची सदस्यांची मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘सिटीज २.०’ प्रकल्पाला अखेर महापालिकेने हिरवा कंदील दिला आहे. या योजनेसाठी महापालिकेकडून २० टक्के आर्थिक सहभाग देण्याचा ठराव सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. शहराच्या हिताच्या दृष्टीने प्रकल्पासाठीचा पहिला हप्ता २६ मार्चपूर्वी जमा करण्याचे निर्देश महापौर मंगेश पवार यांनी प्रशासनाला दिले.
सभेच्या प्रारंभी स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. मात्र केंद्र सरकारकडे पाठवलेल्या प्रस्तावातील माहिती आणि महापालिकेला सादर करण्यात आलेल्या तपशीलात तफावत असल्याचा आरोप सदस्यांनी करत सभागृहात जोरदार चर्चा रंगली. प्रकल्पाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता ठेवावी आणि सदस्यांना सर्व माहिती स्पष्टपणे दिली जावी, अशी मागणी अनेकांनी केली.
सत्ताधारी सदस्य संदीप जीरग्याळ यांनी प्रशासनावर टीका करत यापूर्वी मंजूर झालेल्या ७.५ कोटी रुपयांच्या निधीचा नेमका वापर कसा झाला, असा सवाल उपस्थित केला. शहराचा विकास व्हावा, यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे; मात्र निधीच्या वापरात कोणतीही त्रुटी होता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान सत्ताधारी पक्षनेते हनुमंत कोंगाळी यांनी ‘सिटीज २.०’ योजनेचे समर्थन करताना प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. ही योजना शहरासाठी फायदेशीर ठरणार असली तरी स्मार्ट सिटी प्रशासनाने सदस्यांना अंधारात ठेवू नये, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात सर्व तांत्रिक बाबींची सविस्तर माहिती देण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र विशेष बैठक घेण्याची मागणीही त्यांनी केली.
यावर उत्तर देताना महापौर मंगेश पवार म्हणाले की, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका पूर्ण सहकार्य देण्यास तयार आहे. त्यामुळेच २० टक्के आर्थिक वाटा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र प्रकल्प राबविताना न्यायालयीन बाबी आणि तांत्रिक प्रक्रियेकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.
या निर्णयामुळे ‘सिटीज २.०’ अंतर्गत प्रस्तावित विविध विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून बेळगावच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार असल्याचे मानले जात आहे.








