- जखमी विद्यार्थ्याच्या जिद्दीला मिळाली संवेदनशील साथ
बेळगाव / प्रतिनिधी
अपघातात जखमी झाल्यानंतरही परीक्षा देण्याचा निर्धार करून परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या एका विद्यार्थ्याला बेळगाव जिल्ह्याच्या पदवीपूर्व शिक्षण विभागाचे उपसंचालक एम. एम. कांबळे यांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता कौतुकास्पद ठरली. जखमी अवस्थेत परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याला त्यांनी स्वतः पुढे येत मदतीचा हात दिला.
पायाला प्लास्टर असलेला हा विद्यार्थी व्हीलचेअरवर परीक्षा केंद्रावर दाखल झाला होता. वेदना असूनही परीक्षा देण्याची त्याची जिद्द स्पष्ट दिसत होती. ही परिस्थिती पाहताच उपसंचालक एम. एम. कांबळे यांनी त्याची विचारपूस केली, त्याला धीर दिला आणि परीक्षा केंद्रात सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी तातडीने व्यवस्था केली.
विद्यार्थ्याला आधार देत त्याला परीक्षा केंद्रात नेण्याचा प्रसंग पाहून उपस्थितांमध्ये आदराची भावना निर्माण झाली. विद्यार्थ्याच्या जिद्दीला अधिकाऱ्याने दिलेली मानवी साथ अनेकांच्या मनाला भावली. कर्तव्यपालनात शिस्तीला प्राधान्य देणारे आणि कामात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणारे अधिकारी अशी एम. एम. कांबळे यांची ओळख असली, तरी या घटनेतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील संवेदनशील आणि माणुसकीचा पैलूही समोर आला.








