• पोलीस बंदोबस्त

बेळगाव / प्रतिनिधी

रंगपंचमीच्या उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने शहापूर व वडगाव परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्याची तयारी केली आहे. रविवार, ८ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील भागांत अतिरिक्त पोलीस पथके तैनात करण्यात येणार आहेत.

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर व उपनगरांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सोमवारी व मंगळवारी एकूण १९ तपासणी नाके उभारून वाहनांची तपासणी करण्यात आली. त्याच धर्तीवर शहापूर व वडगाव परिसरातही विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. प्रमुख चौक, बाजारपेठा आणि शहरात येणाऱ्या मुख्य प्रवेशद्वारांवर पोलिसांकडून कडक नजर ठेवली जाणार आहे.

रंगांची उधळण, मिरवणुका आणि सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन स्वतंत्र वाहतूक पथके तैनात करण्यात येणार असून, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून महत्त्वाच्या ठिकाणांवर लक्ष ठेवले जाणार असून काही गर्दीच्या भागांवर ड्रोनद्वारेही नजर ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे.

महिला सुरक्षेच्या दृष्टीने महिला पोलीस पथके कार्यरत राहणार असून छेडछाड किंवा जबरदस्तीने रंग लावण्यासारख्या प्रकारांवर तातडीने कारवाई केली जाणार आहे. ध्वनिप्रदूषण, सार्वजनिक मालमत्तेची हानी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही पोलिसांचे लक्ष राहणार आहे.

सण आनंदात आणि शांततेत साजरा करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, अफवा पसरवू नयेत आणि कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.