• सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक यांची माहिती 
  • एकाचवेळी १२०० शाळांत राबविणार मोहीम

बेळगाव / प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव शालेय वयातच व्हावी आणि कायद्याविषयी भीतीऐवजी समज निर्माण व्हावी, या उद्देशाने बेळगाव जिल्ह्यात ७ मार्च रोजी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सुमारे १२०० माध्यमिक शाळांमध्ये एकाच वेळी बाल हक्क आणि संबंधित कायद्यांवर मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक यांनी दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, टिळकवाडी येथील केएलएस संस्थेत या उपक्रमाचे उद्घाटन न्यायमूर्ती जयंत बॅनर्जी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर जिल्हाभरातील शाळांमध्ये पोक्सो कायदा, बालविवाह प्रतिबंध आणि बालकामगारविरोधी कायद्यांबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली जाईल.

या मोहिमेसाठी ६५ न्यायाधीश, ज्येष्ठ वकील व स्वयंसेवकांची टीम तयार करण्यात आली असून ते प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. कायद्याविषयी मूलभूत समज वाढवणे आणि तक्रार नोंदविण्याच्या प्रक्रियेची माहिती देणे, यावर विशेष भर राहणार आहे.

याशिवाय १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार असून सुमारे २८ हजार प्रकरणे तडजोडीच्या माध्यमातून निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी ८५ पीठे कार्यरत राहतील. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या ९० दिवसांच्या विशेष मोहिमेअंतर्गत सामंजस्यातून प्रलंबित खटले कमी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे नायक यांनी सांगितले.