- बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव येथील जिल्हा न्यायालयात मंगळवारी सकाळी बॉम्ब ठेवल्याचा निनावी संदेश प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली. या संदेशानंतर न्यायालय परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
धमकीची माहिती मिळताच वकील, न्यायाधीश तसेच न्यायालयात उपस्थित नागरिकांना तातडीने बाहेर काढण्यात आले. सर्वांना सुरक्षित स्थळी थांबविण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बॉम्ब शोध पथकाने संपूर्ण न्यायालय परिसराची कसून तपासणी सुरू केली. सध्या तपास यंत्रणा संदेश पाठविणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.
विशेष म्हणजे ही घटना होळीच्या दिवशी घडल्याने सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त खबरदारी घेण्यात आली असून न्यायालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.







