- आठ विद्यार्थ्यांची दिवाणी न्यायाधीशपदी निवड
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावातील नामांकित केएलएस राजा लखमगौडा विधी महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांनी कर्नाटक न्यायिक सेवा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत दिवाणी न्यायाधीशपदी मजल मारली आहे. या घवघवीत यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दिवाणी न्यायाधीशपदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मौनेश बडिगेर, नवीन कोपार्डे, हळ्याळप्पा, प्रियांका राजगोळकर, जगदीश कित्तूर, श्रेया उत्तूरे, विजयकुमार बुद्री आणि नागराज तळवार यांचा समावेश आहे. राज्यस्तरीय स्पर्धात्मक परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत त्यांनी बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि प्राध्यापकांचे योग्य मार्गदर्शन कारणीभूत असल्याची भावना महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केली. भविष्यात सक्षम व नैतिक मूल्ये जपणारे कायदेतज्ज्ञ घडवण्याच्या ध्येयाशी संस्था कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या यशाबद्दलकर्नाटक लॉ सोसायटीचे अध्यक्ष पी. एस. साहुकार, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष ए. के. तगारे, महाविद्यालय नियामक मंडळाचे अध्यक्ष आर. एस. मुतालिक, प्राचार्य डॉ. ए. एच. हवालदार तसेच सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.







