बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव सकल मराठा समाजातर्फे आज गुरुवारी दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहापूर येथील शामाप्रसाद मुखर्जी रोडवरील उद्यानात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

उद्यानातील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी, जय शिवाजी”, “हर हर महादेव” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कार्यक्रमाला समाजातील विविध घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

समन्वयक किरण जाधव यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना शिवरायांचे कार्य आणि त्यांचे अद्वितीय व्यक्तिमत्त्व आजही प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. प्रशासनाने सर्व समाजघटकांना विश्वासात घेऊन शिवजयंती अधिक व्यापक स्वरूपात साजरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत पुढील वर्षी भव्य आयोजनाची ग्वाही मिळाल्याचे त्यांनी सांगितले. शिवजयंती हा केवळ उत्सव नसून तो स्वाभिमानाचा सण म्हणून साजरा व्हावा, असे आवाहनही त्यांनी केले.

साहित्यिक गुणवंत पाटील यांनी शिवजयंती वर्षातून एकदाच नव्हे तर वर्षभर आचरणात आणण्याची गरज अधोरेखित केली. शिवचरित्र हे जीवन जगण्याची दिशा देणारे असल्याचे सांगत त्यांनी शिवरायांच्या कार्यातून संकटांवर मात करण्याची, समाजघटकांना एकत्र बांधण्याची आणि स्वराज्य उभारणीची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन केले. प्रत्येक घरात शिवचरित्र असावे आणि नव्या पिढीने त्यातून बोध घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, ॲड. अमर येळ्ळूरकर, महादेव पाटील, सुनील जाधव यांच्यासह समाजातील पदाधिकारी, महिला नेत्या आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.