• सांगलीच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला ; घरात घुसून जाळपोळ
  • सात जणांना अटक ; उर्वरितांचा शोध सुरू

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावातील बेनकनहळ्ळी येथे कौटुंबिक वादातून दोन गटामध्ये झालेल्या जोरदार हाणामारीने परिसरात खळबळ उडाली आहे. सांगली येथील एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून, या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली आहे.

सोमवारी रात्री सुमारे ९ वाजता सांगली, मुखंडी आणि मुत्यानट्टी येथील काही तरुणांनी बेनकनहळ्ळीतील रहिवासी अविनाश साळुंके यांच्या घरात बेकायदेशीरपणे घुसून तोडफोड व जाळपोळ केली. अविनाश साळुंके यांची बहीण आणि दीपक नावाच्या व्यक्तीमधील जुना वैवाहिक वाद हे या घटनेमागील कारण असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या समेटाच्या चर्चेला यश न आल्याने संतप्त गटाने साळुंके कुटुंबावर हल्ला चढविल्याची माहिती आहे.

या हल्ल्यात अविनाश साळुंके, बालाजी साळुंके आणि मीना नाईक जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणातील १२ मुख्य आरोपींपैकी सात जणांना पोलिसांनी अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेली कार आणि दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

या घटनेबाबत पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी हल्लेखोरांविरुद्ध गुंडगिरीचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले असून, सखोल चौकशीनंतरच संपूर्ण सत्य समोर येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.