बेळगाव / प्रतिनिधी

कौटुंबिक वादाला कंटाळून एका तरुणाने किल्ला तलावात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला हा तरुण मृतावस्थेत आढळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सुभाष हलगेकर (वय ३२, रा. घाडी कॉलनी, शहापूर) असे मृत तरुणाचे नाव असून तो बेळगाव महापालिकेत पौरकार्मिक म्हणून कार्यरत होता. अलीकडेच तो नोकरीत कायम झाला होता. मात्र वैवाहिक आयुष्यातील सततच्या वादामुळे तो मानसिक तणावात असल्याची माहिती समोर आली आहे.

घरातील वारंवार भांडणांमुळे त्याची पत्नी माहेरी गेली होती. त्यानंतर सुभाष दोन दिवसांपासून बेपत्ता होता. याबाबत शहापूर पोलीस स्थानकात तक्रारही नोंदविण्यात आली होती.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी किल्ला तलावात एक मृतदेह तरंगताना आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मार्केट पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडलेल्या या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, शशिकांत आंबेवाडीकर, मायकल पिंटो, राजू टक्केकर आणि अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.