• सहा जणांना अटक

बेळगाव / प्रतिनिधी

शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी एकाच दिवसात अनेक ठिकाणी कारवाया करत विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सहा जणांना अटक केली. सीसीबी आणि स्थानिक पोलीस ठाण्यांच्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकत दुचाकी चोरी, मटका जुगार आणि अंमली पदार्थ सेवन प्रकरणांचा पर्दाफाश केला.

सीसीबी पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणात रजत शिवणगेकर आणि विठ्ठल आरेर या दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून सुमारे १.२० लाख रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त केल्या. या चोऱ्या एपीएमसी आणि मार्केट पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडल्या होत्या. पीएसआय मंजुनाथ भजंत्री यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, शहापूर पोलिसांनी मटका जुगारावर छापा टाकून शुभम कन्नुकले, मिलिंद सुतार यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि रोख रक्कम जप्त केली. तसेच टिळकवाडीतील इंद्रप्रस्थ नगर येथे गांजा सेवन करणाऱ्या विराज कांग्राळकर आणि सुनील असलकर या दोघांना मार्केट पोलिसांनी अटक केली. सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून विविध प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे.