- हिट अँड रनचा प्रयत्न फसला
- दुचाकीस्वार गंभीर जखमी ; कार कॅन्टरवर आदळून चिरडली
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावमध्ये भरधाव कारच्या निष्काळजीपणामुळे दुहेरी अपघाताची घटना घडली. सुवर्ण विधानसौध समोर दुचाकीला धडक दिल्यानंतर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र काही अंतरावरच कार कॅन्टरवर आदळून चिरडली गेली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून कारचालक किरकोळ जखमी झाला आहे.
हलगा-बस्तवाड येथील सुतार देवेंद्र चौगुले (दुचाकी क्र. KA-22 EH-6342) हे बेळगावकडे जात असताना सुवर्ण विधान सौधच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्याच्या कडेला असताना मागून आलेल्या महाराष्ट्र पासिंगच्या कारने (MH-11 CW-9495) जोरदार धडक दिली. धडकेच्या तीव्रतेमुळे चौगुले रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमी चौगुले यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र गांधीनगर परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कॅन्टरला कारची जोरदार धडक बसली. या धडकेत कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. कारचालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.एकाच घटनेत दोन अपघात घडल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.








