• सुळगा (हिं.) येथे महालक्ष्मी मंदिराचे लोकार्पण

सुळगा (हिं.) / वार्ताहर

राजकारणात आश्वासने दिली जातात, पण ती पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारणारे नेतृत्व दुर्मिळ असते. मी दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची पूर्तता ही माझी नैतिक जबाबदारी आहे, असे ठाम मत महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सुळगा (हिं.) येथे व्यक्त केले.

सुळगा (हिं.) गावात नव्याने उभारण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळ्यानिमित्त आयोजित लोकार्पण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या धार्मिक सोहळ्याला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला.

मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की, गेल्या सात वर्षांत मतदारसंघातील १५० पेक्षा अधिक मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला असून यासोबतच रस्ते, पाणी, वीज आणि इतर मूलभूत सुविधांच्या विकासावर सातत्याने भर देण्यात येत आहे. प्रत्येक गावातील यात्रांसाठी ३ ते ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मतदारसंघातील विकासकामांसाठी मी कधीही मागे हटले नाही, असे सांगत मंत्री हेब्बाळकर यांनी केवळ निवडणुकीपुरते सक्रिय होणाऱ्या लोकांपेक्षा सातत्याने काम करणाऱ्यांवर विश्वास ठेवावा, असे आवाहन उपस्थितांना केले.

या प्रसंगी मंदिर उभारणीसाठी योगदान देणाऱ्या ग्रामस्थ व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला काडा अध्यक्ष युवराज कदम, बाळू देसुरकर, भागाण्णा नरोटी, संजय पाटील, रमेश खन्नुकर, पंचायत विकास अधिकारी वीणा हलवाई, जयवंत बाळेकुंद्री, मारुती पाटील, मल्लाप्पा सुळगेकर, काशीराम पाटील, अजित कलखांबकर, पप्पू पाटील, यल्लप्पा कलखांबकर, मनोज कलखांवकर, शेखर पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.