- भंडाऱ्याच्या उधळणीत देवीचा जयघोष
- लक्ष्मी मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
सुळगा (हिं.) / वार्ताहर
भंडाऱ्याची उधळण, धनगरी वाद्यांचा गजर आणि लक्ष्मीदेवीच्या जयघोषाने सुळगा (हिं.) गाव गुरुवारी (दि. ५) भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले. लक्ष्मी मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या कलश मिरवणुकीत ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
सुळगे येथील लक्ष्मी मंदिराची वास्तुशांती, कळसारोहण, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळ्याला सोमवारपासून (दि. २) प्रारंभ झाला आहे. या सोहळ्याच्या अनुषंगाने गुरुवारी केंबाळी नाल्यापासून कलश मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मान्यवरांच्याहस्ते पालखी पूजन झाल्यानंतर बेळगाव–वेंगुर्ला मार्गाने मिरवणूक मार्गस्थ झाली.

मारुती गल्ली, आंबेडकर गल्ली, वेंगुर्ला रोड, मिलकी रस्ता, कोवाडकर गल्ली, बेनकनहळळी रोड, मरगाई गल्ली, गणपत गल्ली, संभाजी गल्ली, देशपांडे कॉलनी आणि शंकर गल्ली मार्गे मिरवणूक लक्ष्मी मंदिरात दाखल झाली. भंडाऱ्याच्या उधळणीने संपूर्ण परिसर पिवळाधम्मक झाला होता.
मिरवणुकीत भजनी मंडळांचा सहभाग लक्षवेधी ठरला. धनगरी वाद्ये आणि बेंजोच्या तालावर युवक, युवती व महिलांनी नृत्याचा आनंद लुटला. लक्ष्मीदेवीच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांसाठी ठिकठिकाणी पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
दरम्यान, मंगळवारी (दि. ३) हरिपाठ, धान्याभिषेक व भारुड भजन, बुधवारी (दि. ४) हरिपाठ व भजन कार्यक्रम पार पडले. शुक्रवारी (दि. ६) विविध धार्मिक विधी तर शनिवारी (दि. ७) सूर्योदयाला कळसारोहण होणार असून या भक्तीमय सोहळ्याची सांगता होणार आहे.







