- व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रेल्वे अर्थसंकल्पातील तरतुदींची माहिती
नवी दिल्ली : कर्नाटकातील रेल्वे पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठी तरतूद करण्यात आली असून राज्यातील ६१ रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी २११० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रेल्वे अर्थसंकल्पातील तरतुदींची सविस्तर माहिती दिली.
याअंतर्गत गोकाक रोड, बागलकोट, धारवाड आणि मुनीराबाद या रेल्वे स्थानकांचे विकासकाम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. तर अळणावर, बदामी, कोप्पळ आणि बंटावाला या रेल्वे स्थानकांचे काम सध्या प्रलंबित असून लवकरच ते सुरू होण्याची शक्यता आहे.
कर्नाटकात सध्या १२ वंदे भारत एक्स्प्रेस आणि ३ अमृत भारत एक्स्प्रेस धावत असून त्यामुळे प्रवाशांना वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. राज्यातील रेल्वेमार्गांचे ९७ टक्के विद्युतीकरण पूर्ण झाल्याने रेल्वे वाहतूक अधिक सक्षम झाली आहे.
गोव्यात नैऋत्य रेल्वेच्या वतीने विविध विकासकामे सुरू असून तेथील तीन रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण ६५ कोटी रुपये खर्चून करण्यात येत आहे. तसेच गोव्यातून दोन वंदे भारत एक्स्प्रेस धावत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
या कार्यक्रमास नैऋत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक पी. आनंद, विभागीय व्यवस्थापक आशुतोषकुमार, हुबळी विभागाच्या बेला मीना यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.








