बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यातील वंटमुरी येथे महिलेला विवस्त्र करून अमानुष मारहाण केल्याच्या गाजलेल्या प्रकरणात न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण आणि कडक निकाल दिला. या अमानवी कृत्यात दोषी ठरविण्यात आलेल्या सर्व १२ आरोपींना प्रत्येकी ५ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
बेळगावचे अतिरिक्त दहावे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच. एस. मंजुनाथ यांनी आज शिक्षेचे प्रमाण जाहीर केले. बसप्पा नाईक, राजू नाईक यांच्यासह एकूण १२ आरोपींना विविध गंभीर कलमांखाली सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. निकाल जाहीर होताच न्यायालय परिसरात उपस्थित असलेल्या दोषी व त्यांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला.
या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. महिलेवरील अत्याचारामुळे समाजमन हादरले होते. सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील एल. एस. सुळ्ळद यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. साक्षीदारांचे जबाब, उपलब्ध पुरावे आणि घटनाक्रमाचा सखोल विचार करून न्यायालयाने हा निकाल दिला.
समाजात महिलांविरोधातील अत्याचारांना आळा घालण्यासाठी आणि दोषींना जरब बसवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, अशा कृत्यांना कोणतीही माफी नाही, असा ठाम संदेश या निकालातून देण्यात आला आहे.








