बेळगाव / प्रतिनिधी
वायव्य परिवहन महामंडळाने बेळगाव शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत बेळगाव येथील पहिल्या आगाराच्या नव्या बांधकामासाठी ६ कोटी ७५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. या अनुदानाअंतर्गत आगार उभारणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून, १३ फेब्रुवारी ही निविदा भरण्याची अंतिम तारीख आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पामुळे बेळगावमधील बस व्यवस्थापन अधिक सुसूत्र व आधुनिक होणार असून विशेषतः आंतरराज्य आणि लांब पल्ल्याच्या बसच्या संचालनाला मोठा फायदा होणार आहे.
यापूर्वी मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात पहिले आगार कार्यरत होते, आता वाढती वाहतूक, जागेची कमतरता आणि आधुनिक सुविधांची गरज लक्षात घेऊन नव्या ठिकाणी स्वतंत्र व सुसज्ज मात्र आगार उभारण्यात येणार आहे. १०० केव्ही क्षमतेचा नवीन वायव्य परिवहन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार दरम्यान, मंडळाने चिकोडी येथील नूतन विभागीय कार्यालयाच्या पहिल्या मजल्याच्या बांधकामासाठी पाच कोटी ७२ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. या इमारतीमुळे प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडणे शक्य होणार असून, कर्मचारी तसेच प्रवाशांना सुधारित सेवा मिळणार आहेत. याशिवाय बैलहोंगल बसस्थानकातील ट्रान्सफॉर्मर स्थलांतर व नवीन वाणिज्य गाळ्यांसाठी वीज जोडणी करण्यासाठी आहे. यासाठीही स्वतंत्रपणे निविदा मागविली असून, प्रथम दर्जा पात्र कंत्राटदारांकडून निविदा स्वीकारल्या जाणार आहेत. या सर्व कामांसंबंधीची सविस्तर माहिती परिवहन महामंडळातर्फे संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. एकूणच या प्रकल्पांमुळे बेळगाव, चिक्कोडी आणि बैलहोंगल परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि आधुनिक होण्यास चालना मिळणार आहे.








