• अत्यंत साधेपणाने घेतली शपथ

मुंबई : बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात आणि देशभर शोक व्यक्त केला जात आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि या रिक्त पदावर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यामुळे महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री लाभल्या आहेत.

लोकभवनातील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा अत्यंत साधेपणाने पार पडला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव आणि राजशिष्टाचार अधिकारी उपस्थित होते.

सुनेत्रा पवार शुक्रवारी रात्रीच बारामतीहून मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. शनिवारपासून राज्यातील राजकीय घडामोडींना गती आली आणि विधिमंडळ गटनेतेपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत दिलीप वळसे पाटलांकडून गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला आणि छगन भुजबळ यांनी त्याला अनुमोदन दिले, परिणामी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड झाली.

यानंतर पक्षाचे नेते धनंजय मुंडे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, संजय बनसोडे यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन गटनेतेपदी निवडीचे पत्र सादर केले. नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते पत्र राज्यपालांना पाठवले.

त्यानुसार, शपथविधी सोहळा संध्याकाळी ५ वाजता पार पडला. मर्यादित लोकांना शपथविधीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. शपथविधी सोहळा अवघ्या १० मिनिटांत अत्यंत साधेपणाने पार पडला. यावेळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार या महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.