बेळगाव / प्रतिनिधी

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शोकसभेद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बेळगाव येथे आयोजित बैठकीत त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळत शोक व्यक्त केला.

यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर यांनी सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांसाठी अजित पवार यांनी बजावलेल्या भूमिकेचा उल्लेख केला. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात सीमाभागातील मराठी समाजासाठी विशेष तरतूद करण्याचे योगदान त्यांनी अधोरेखित केले.

माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी सीमाभागातील प्रश्न व मराठी भाषेच्या मागण्यांकडे महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यात अजित पवार यांची भूमिका महत्त्वाची होती, असे सांगितले. नेताजी जाधव यांनी त्यांच्या निधनाने महाराष्ट्रासह सीमावर्ती भागात शोककळा पसरल्याची भावना व्यक्त केली.या शोकसभेला प्रकाश मरगाळे, आर.एम.चौगुले, मदन बामणे, शुभम शेळके, अश्वजीत चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.