सुळगा (हिं.) : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मकरसंक्रांतीचे हळदीकुंकू मैत्रेयी कलामंच मंडळाने अनोख्या पद्धतीने केले.नवरात्री क्विन स्पर्धेमुळे स्मार्ट बनलेल्या सुळगा (हिं.) येथील आगळ्यावेगळ्या “सासू-सून” या समूहाला एक आदर्श म्हणून भेट देऊन त्यांंच्यासोबत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला.

अचानक भेट दिल्यावर सासू – सून समूहाला आनंद झाला व मैत्रेयी कलामंच समूहाचे कौतुकही वाटले. थोड्या गप्पाटप्पा, कवितांची मैफिल तिळगुळ व वाणाची देवाणघेवाण अशा आयोजनाने कार्यक्रम रंगत गेला.घरची शेतीची जबाबदारी अंगावर असल्याने त्या महिला कुठे बाहेर पडू शकत नाहीत.काहीतरी विरंगूळा हवा म्हणून सुळग्यातीलच स्मिता पाटील यांच्या पुढाकारातून हा समूह तयार झाला आणि बघता बघता त्यांच्या कलागुणांना वाव मिळून चर्चेत आला.या महिला गाव सोडून शहरातील कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाहीत. हे लक्षात घेऊन मैत्रेयी कलामंच मंडळ त्यांच्या भेटीला आले.त्यांनीही खुप आनंदाने या मंंडळाचे स्वागत केले.

प्रारंभी प्रा. डाॅ. मनिषा नाडगौडा यांनी प्रास्ताविक करताना मैत्रेयी कलामंच मंडळाचा उद्देश, कार्याचा आढावा घेतला. प्रतिभा सडेकर यांनी मकर संक्रांत का साजरी करतात, हळदी – कुंकूचे महत्व याविषयावर सुंदर माहिती सांगितली.रोशनी हुंद्रे यांनी स्त्रियांवर आधारित कविता सादर केली.मंडळातील इतर सदस्यांनी सासू – सून समूहाशी संवाद साधत त्यांच्या नात्यांतील जिव्हाळा जाणून घेतला. अडीच – तीन तासांच्या या कार्यक्रमातून तिथले वातावरण अगदी हसतेखेळते झाले होते.वाण म्हणून मैत्रेयी कलामंच मंडळातर्फे टिफिन बॅग देण्यात आल्या. समारोपात स्मिता पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. स्मिता पाटील यांनी अल्पोपहाराची उत्तम सोय केली होती.