बेळगाव / प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) बेळगावच्या वतीने येत्या २४ व २५ जानेवारी रोजी २८ वा ‘हरे कृष्ण रथयात्रा महोत्सव’ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाची माहिती इस्कॉनचे अध्यक्ष भक्तिरसामृत स्वामी महाराज यांनी दिली.
शनिवारी शहरातील मुख्य बाजारपेठ व प्रमुख मार्गांवरून श्री राधा–कृष्ण तसेच निताई गौर सुंदर भगवान यांची भव्य रथयात्रा काढण्यात येणार आहे. या रथयात्रेत कर्नाटकसह इतर राज्यांतील तसेच परदेशातील हजारो भाविक सहभागी होणार आहेत. रथयात्रा मार्गावर ५० हजारांहून अधिक प्रसाद पाकिटांचे वाटप, आकर्षक रांगोळी सजावट व सांस्कृतिक चित्ररथ ही यंदाच्या महोत्सवाची वैशिष्ट्ये असणार आहेत.
टिळकवाडी येथील इस्कॉन मंदिराच्या मागील मैदानावर दोन दिवस भव्य मंडपामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वरिष्ठ संन्यासी व विद्वानांची प्रवचने, भक्ती संगीत तसेच मुलांसाठी सांस्कृतिक स्पर्धांचा समावेश आहे.
महोत्सवस्थळी गो-सेवा दालन, आध्यात्मिक ग्रंथांचे प्रदर्शन तसेच दररोज रात्री सुमारे ५० हजार भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. या रथयात्रेत सहभागी होऊन श्रीकृष्णाचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन इस्कॉनच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.
या संदर्भातील पत्रकार परिषदेला राम दास, बलराम भक्त दास, नागेंद्र दास, निताई निमाय दास, अमृत कृष्ण दास, वदान्य चैतन्य दास, श्वेत निताई दास, श्री रामायण दास, कृष्णाश्रय दास तसेच अन्य सदस्य उपस्थित होते.








