बेळगाव / प्रतिनिधी

खासबाग परिसरातील बसवेश्वर चौक ते नाथ पै चौक दरम्यान दर रविवारी भरणाऱ्या खासबागच्या आठवडी बाजारात शिस्त लावण्यास पोलीस प्रशासन व महापालिकेने सुरुवात केली असून, यासाठी स्थानिक नगरसेवक रवी साळुंखे यांचा महत्त्वपूर्ण पाठपुरावा सुरू आहे.

बेळगाव शहरातील हा मोठा आठवडी बाजार असल्याने दर रविवारी मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते व नागरिकांची गर्दी होते. परिणामी वाहतुकीची कोंडी, चोरीच्या घटना तसेच स्थानिक नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर आज रविवारी सकाळी नगरसेवक रवी साळुंखे यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह बाजार मार्गावर प्रत्यक्ष आरेखन करून रस्त्यावर बसून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना ठराविक जागेतच बसण्याच्या सूचना दिल्या.

बेळगाव तालुक्यातील अनेक छोटे भाजी विक्रेते तसेच उपनगरातील नागरिक मोठ्या संख्येने या बाजारात येत असल्याने सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाजार परिसर गजबजलेला असतो. याच मार्गावरील दुभाजकावर उभारलेले गाळे मात्र गेल्या चार वर्षांपासून रिकामे असून, ते बाजार व्यवस्थापनासाठी अडचणीचे ठरत आहेत.

महापालिका आयुक्त व नगरसेवक रवी साळुंखे यांनी यापूर्वी या मार्गाची पाहणी करून स्थानिक नागरिकांशी चर्चा केली होती. त्यानंतर आठवडी बाजाराच्या दिवशी आरेखन करून दिलेल्या जागेतच विक्रेत्यांना बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मागील रविवारी या उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून, नेहमी गजबजलेले रस्ते काहीसे मोकळे झाले होते. आजही नगरसेवक रवी साळुंखे यांनी विक्रेत्यांना बाजार मार्गावर दोन्ही बाजूंनी आरेखनानुसारच विक्री करण्याच्या सूचना दिल्या.