• महाराष्ट्र एकीकरण समितीकडून हुतात्म्यांना अभिवादन

खानापूर / प्रतिनिधी

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने १७ जानेवारी रोजी हुतात्मा दिन अत्यंत गांभीर्यपूर्ण वातावरणात पाळण्यात आला. यानिमित्त स्टेशन रोड, खानापूर येथील हुतात्मा कै. नागाप्पा होसुरकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

यावेळी समितीचे अध्यक्ष सूर्याजी पाटील यांनी हुतात्म्यांना अभिवादन करताना सांगितले की, “जोपर्यंत संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात विलीन होत नाही, तोपर्यंत रस्त्यावरची चळवळ थांबवणार नाही. सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करण्यासाठी अखेरपर्यंत लढत राहणे हीच कै. हुतात्मा नागाप्पा होसुरकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल.”

खानापूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती सुरेशराव देसाई यांनीही यावेळी विचार व्यक्त करताना म्हटले की, “ज्या ध्येयासाठी हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले, ते कार्य पूर्ण करण्यासाठी खानापूर तालुक्यासह संपूर्ण सीमाभागातील मराठी जनतेने एकसंघ होऊन केंद्र व राज्य सरकारविरोधात हा लढा अधिक तीव्रतेने सुरू ठेवणे आवश्यक आहे. येणाऱ्या पिढीलाही या चळवळीत सामावून घेऊन समितीच्या झेंड्याखाली एकत्रितपणे कार्यरत राहूया.”

या अभिवादन कार्यक्रमास समितीचे ज्येष्ठ नेते पी. एच. पाटील, रविंद्र पाटील, युवा समितीचे कार्याध्यक्ष किरण पाटील, राजू पाटील, प्रभाकर बिरजे, अर्जुन देसाई यांच्यासह तालुका समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.