येळ्ळूर : येथील हिंदवी स्वराज्य युवा संघटना आणि ग्रामस्थांच्यावतीने येळ्ळूर गावचे सुपुत्र कु.चंदन कुमार खेमणाकर यांची भारतीय नौदलात लेफ्टनंट पदी निवड झाल्याबद्दल श्री शिवस्मारक, येळ्ळूर येथे गौरव करण्यात आला. यावेळी त्यांना श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्याचा मान देण्यात आला. यानंतर हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्या वतीने कु. चंदन खेमणाकर यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिवकन्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना चंदन खेमणाकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाच्या सागरी किनारपट्टीच्या संरक्षणासाठी नौदलाची स्थापना केली होती. अशा थोर महापुरुषांच्या मूर्तीचे पूजन करण्याचा मान मिळणे हे माझ्यासाठी मोठे भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच भविष्यात गावातील नौदल तसेच इतर क्षेत्रात जाण्याची इच्छा असलेल्या युवकांना मार्गदर्शन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या श्री शिवस्मारकाच्या कार्याबद्दल त्यांनी हिंदवी स्वराज्य युवा संघटनेचे कौतुक केले आणि या सत्कार सोहळ्याबद्दल संघटनेचे मनापासून आभार मानले.