• ६ जण अटकेत ; ६,७४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कडक मोहीम हाती घेत मटका आणि जुगार अड्ड्यांवर छापे टाकले. दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये मटका घेणारा एक जण आणि जुगार खेळणारे पाच जण अशा एकूण ६ जणांना अटक करण्यात आली असून, हजारो रुपयांची रोकड व साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पहिली कारवाई कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. विजयनगर रोडवरील सार्वजनिक ठिकाणी मटका घेत असताना नारायण सावंत (रा. हिंडलगा) याला पोलीस उपनिरीक्षक ए. रुक्मिणी यांच्या पथकाने रंगेहात पकडले. त्याच्याकडून ३,१४६ रुपये रोख व संबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुसरी कारवाई हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने बस्तवाड गावाजवळ केली. तेथे जुगार खेळत असलेल्या बुद्धिराज भागण्णावर, किरण अल्लाते, भरतेश संकेश्वरी, विनायक गवळी आणि सूरज दळवी या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. या ठिकाणाहून ३,६०० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले.

या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ६,७४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध धंद्यांविरोधातील या यशस्वी कारवाईबद्दल शहर पोलीस आयुक्त व उपायुक्तांनी संबंधित पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.