• ऑटोरिक्षासह आठ हजार रुपये जप्त

बेळगाव / प्रतिनिधी

हिरेबागेवाडी येथील धारवाड बसस्टँडजवळ दुकान फोडून १२ हजार रुपये रोकड पळविल्याच्या आरोपावरून हुबळी येथील दोन महिलांसह तिघा जणांना हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून ऑटोरिक्षा व आठ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

योगेश राव (वय ४०) मूळचा राहणार बॅडरहळ्ळी, बेंगळूर उत्तर, सध्या राहणार सदाशिवनगर-हुबळी, सावित्री कृष्णा वज्जन्नावर (वय ३९), जानकी बसवराज शेट्टेण्णावर (वय ५१) दोघीही राहणार शिवशंकर कॉलनी, जुने हुबळी अशी त्यांची नावे आहेत. या टोळीतील आणखी एक महिला फरारी असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.

योगेश व तीन महिला केए ०२ एके ७०६५ क्रमांकाच्या रिक्षातून संकेश्वरला गेले होते. संकेश्वरहून हुबळीला परतताना हिरेबागेवाडी येथील धारवाड बसस्टँडजवळ एक दुकान फोडून १२ हजार रुपये पळविले होते. हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक एस. के. होळेण्णावर, उपनिरीक्षक बी. के. मिटगार, एम. आय. तुरंमरी, ए. एच. अगशीमनी, प्रशांत आरेर, एस. बी. पदकीमठ, बी. एस. माळगी, प्रितम कोचेरी, आर. एस. केळगीनमनी, पी. एस. भुशी, के. एम. संगयनावर, एम. एस. कडेन्नावर, कमला पुजेर, सुनंदा पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन महिलांसह तिघा जणांना अटक करून सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीची ऑटोरिक्षा व आठ हजार रुपये रोख रक्कम, एटीएम कार्ड जप्त केले आहे.