बेळगाव / प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात असल्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला आहे. प्रशासनाने आपली जबाबदारी पार पाडताना निष्काळजीपणा केल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा ॲड. ए. डी. नदाफ यांनी दिला आहे.
बेळगाव येथील कन्नड साहित्य भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा प्रशासन सर्वोच्च न्यायालयाच्या नोव्हेंबर २०२५ मधील आदेशांचे उल्लंघन करत असून भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर अनावैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करत असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरातील सर्व भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करून त्यांना पुनर्वसन केंद्रात हलवावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कुत्र्यांना पकडून पुन्हा सोडून देण्याचे कोणतेही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले नाहीत, असे नदाफ यांनी ठामपणे सांगितले. या कामासाठी स्वयंसेवी संस्था किंवा प्राणीप्रेमींवर अवलंबून राहण्याऐवजी प्रशासनाने स्वतः जबाबदारी स्वीकारावी, असेही त्यांनी नमूद केले. सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांचा वावर कमी करण्यासाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशांचा सखोल अभ्यास न केल्यास जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. प्राण्यांवर प्रेम करणाऱ्यांना लहान मुलांचे जीव दिसत नाहीत का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
या पत्रकार परिषदेला एम. एम. जमादार, एम. एस. खेमलापूर, डब्ल्यू. एम. शहापुरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.








