• सुमारे ३९ लाखांच्या निधीतून नवीन वाहने 
  • काही सुधारणा झाल्यानंतर लोकार्पण

बेळगाव / प्रतिनिधी

म्हैसूर मॉडेलच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या दोन नव्या, अत्याधुनिक शववाहिका बेळगाव महानगरपालिकेच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. या दोन्ही शववाहिका सध्या सदाशिवनगर स्मशानभूमीतील पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये आणखी काही सुधारणा करण्याच्या सूचना महापौर मंगेश पवार यांनी दिल्या आहेत. आवश्यक बदल पूर्ण झाल्यानंतर लवकरच या शववाहिन्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

बेळगाव शहर व उपनगरात मृत्यू झालेल्यांचे पार्थिव नेण्यासाठी महानगरपालिकेच्या शववाहिन्यांचा वापर केला जातो. मात्र सध्या उपलब्ध असलेल्या बहुतांश शववाहिका जुन्या झाल्याने त्या वारंवार नादुरुस्त होण्याच्या तक्रारी येत होत्या. वेळेत शववाहिका उपलब्ध न होण्याबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती.

याच पार्श्वभूमीवर आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत अत्याधुनिक शववाहिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार म्हैसूर येथील शववाहिन्यांची पाहणी करून त्याच धर्तीचे मॉडेल तयार करण्याची ऑर्डर उद्यमबाग येथील एका कारखान्याला देण्यात आली. सुमारे ३९ लाख रुपयांच्या निधीतून या दोन नवीन शववाहिका तयार करण्यात आल्या आहेत.

सध्याच्या जुन्या शववाहिन्यांमधून पार्थिव बंद दरवाजाआड नेले जाते, मात्र नवीन शववाहिकांमुळे ही सेवा अधिक सुसज्ज, सन्मानपूर्वक आणि नागरिकांसाठी सोयीस्कर ठरणार आहे. आवश्यक दुरुस्ती आणि सुधारणा पूर्ण झाल्यानंतर या शववाहिका लवकरच सेवेत दाखल होणार आहेत.