• खासगी बससाठी चार स्वतंत्र थांबे निश्चित करण्याचा निर्णय

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी खासगी बससाठी चार स्वतंत्र थांबे निश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या संदर्भात आज पोलीस आयुक्तालयात खासगी बस चालक व मालकांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

सध्या शहरातून दररोज सुमारे ७९ खासगी लांब पल्ल्याच्या बसेस धावत असून, आरटीओ कार्यालय, रामदेव सर्कल यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी बस थांबवून प्रवासी चढवले जात असल्याने विशेषतः सुटीच्या दिवशी वाहतुकीची कोंडी होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून शहराबाहेरील तसेच महामार्गालगत ठिकाणी बस थांबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

यामध्ये भरतेश कॉलेज परिसर, धर्मनाथ सर्कलसह महामार्गालगतच्या जागांचा समावेश असून, या ठिकाणी खासगी बससाठी स्वतंत्र थांबे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या नव्या व्यवस्थेमुळे शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होईल, असा विश्वास पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी व्यक्त केला.

या बैठकीस डीसीपी निरंजनराजे अर्स, एसीपी ज्योतिबा निकम, सीपीआय श्रीकांत तोटगी यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.