- मध्यवर्ती म. ए. समितीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साकडे
बेळगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात प्रलंबित असलेल्या प्रकरणावर तातडीने लक्ष देण्यात यावे, यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन उच्चाधिकार समितीची बैठक त्वरित आयोजित करण्याची मागणी केली आहे. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त सातारा येथे आले असताना ही भेट घेण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नाची सुनावणी २१ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, त्या पार्श्वभूमीवर शासनाने आवश्यक पूर्वतयारी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. वरिष्ठ वकिलांसोबत चर्चा, आवश्यक कागदपत्रे, साक्षीदारांची शपथपत्रे आणि एकूणच न्यायालयीन रणनिती ठरवण्यासाठी तातडीने बैठक घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले.
गेल्या दीर्घकाळापासून महाराष्ट्र शासनाकडून सीमाप्रश्नाबाबत ठोस भूमिका दिसून येत नसल्यामुळे बेळगावसह सीमाभागात असंतोष वाढत असल्याची बाबही यावेळी मांडण्यात आली. याउलट कर्नाटक सरकार या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले.
सीमा समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांच्या पुढाकारातून ही भेट घडून आली. या प्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रकाश मरगाळे, विनोद अंबेवाडीकर, मारुती मरगाणाचे, सतीश देसाई, महादेव मंगणाकर, बाबु कोले, सुहास हुद्दार, निरंजन सरदेसाई, उमेश पाटील, शुभम हंडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.








