- बंदोबस्त व्यवस्थेची केली पाहणी
बेळगाव / प्रतिनिधी
नूतन पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी शनिवारी सौंदत्ती येथील यल्लम्मा देवी मंदिरास भेट दिली. सध्या सुरू असलेल्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संपूर्ण सुरक्षा व बंदोबस्त व्यवस्थेचा आढावा घेतला.
गेल्या गुरुवारी बेळगाव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ही त्यांची पहिली भेट होती. यावेळी भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, सुरक्षित वातावरण राहावे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताबाबत त्यांनी माहिती घेतली. तसेच वाहन वाहतुकीचे नियोजन, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्वच्छता व्यवस्था व आरोग्य सुविधांचीही पाहणी करण्यात आली.
यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व संबंधित विभागांनी दक्षता बाळगावी, अशा स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन परस्पर समन्वय राखत नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.








