बेळगाव / प्रतिनिधी

हैदराबाद येथील गच्चीबोली येथे पार पडलेल्या साऊथ झोन राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या तनुज सिंग याने चमकदार कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे. आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या या जलतरणपटूने १७ वर्षांखालील (ग्रुप १) गटात कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व केले.

तनुजने १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक ही शर्यत १ मिनिट ०९.४० सेकंद अशा वेळेत पूर्ण करून द्वितीय क्रमांक पटकावला. तो जी.एस.एस. कॉलेजचा विद्यार्थी असून, त्याला आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबचे एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. त्याच्या या यशामुळे बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.