बेळगाव / प्रतिनिधी
आधार एज्युकेशन सोसायटी संचारित श्री शिवबसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच बेनकनहळ्ळी येथील घरकुल वृद्धाश्रमाला भेट दिली. यामध्ये विद्यार्थ्यांनी जेष्ठ नागरिकांशी संवाद साधला. तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करून ज्येष्ठांचे मनोरंजन केले. यावेळी डॉ. अस्मिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली होमिओपॅथी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.
वृद्धाश्रमाचे संचालक राजीव पोतदार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सेवा सुविधांबद्दल माहिती दिली. दैनंदिन आहार, आरोग्य आणि वैद्यकीय तपासणी याबद्दल देखील त्यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरे दिली. होमिओपॅथीशास्त्रामध्ये एफएमटी शाखेच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन आणि विविध विषयांवर मनोरंजक खेळ सादर करून उपस्थितांची मने जिंकली. युवा विद्यार्थ्यांनी त्यांच्या समवेत आनंदाने वेळ घालवला. याबद्दल ज्येष्ठ सदस्यांनी त्यांचे आभार मानले. आधार शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. डी. टी. बामणे यांच्या मार्गदर्शनानुसार उपक्रमाचे संयोजन करण्यात आले होते.







