• सदलगा परिसरातील घटना
  • पशुसंवर्धन विभागाकडून नुकसान भरपाईचे आश्वासन

चिक्कोडी / वार्ताहर

चिक्कोडी तालुक्यातील सदलगा शहराच्या बाहेरील भागात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका मेंढपाळाच्या १५ मेंढ्या व शेळ्या ठार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून मेंढपाळ कुटुंबासमोर उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

सदलगा येथील मेंढपाळ रामा महिपती यांच्या शेतात रात्रीच्या सुमारास भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या शेळ्या व मेंढ्या जागीच मृत्युमुखी पडल्या. घटनेची माहिती मिळताच चिक्कोडी तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. टोपन्ना घंटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी डॉ. घंटे यांनी शासनाकडून लवकरच नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले. मात्र, गरीब परिस्थितीत जीवन जगणाऱ्या रामा महिपती कुटुंबाकडे जमीन, घर किंवा इतर उत्पन्नाचे साधन नसल्याने या घटनेमुळे त्यांच्यासमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे. दरम्यान, मेंढपाळांनी शासनाकडे तातडीने योग्य भरपाई देण्याची तसेच भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी नगरपालिकेने ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली आहे.