बेळगाव / प्रतिनिधी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी राज्यातील ड्रग्ज माफिया आणि बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुद्द्यावरून काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली. बेळगाव येथील पर्यटन केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, “राज्यातील अंमली पदार्थांच्या वाढत्या प्रकरणांमुळे कर्नाटक पंजाबसारखे होत चालले आहे,” असा गंभीर आरोप केला.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गृहजिल्ह्यातील म्हैसूरमध्ये महाराष्ट्र पोलिस ड्रग्ज माफियांचा पर्दाफाश करत असताना कर्नाटक सरकार आणि गृहमंत्री मात्र कठोर कारवाई करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप विजयेंद्र यांनी केला. ड्रग्ज माफियांना आळा घालण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

बेंगळुरूतील येलहंका मतदारसंघातील कोगिलू भागात केरळमधून आलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांचा मुद्दा उपस्थित करत, सरकार त्यांना घरे देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “१ जानेवारी रोजी कन्नडिग आणि गरिबांसाठी घरे देण्याची घोषणा असताना, बेकायदेशीर स्थलांतरितांना घरे देण्याचा आधार काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत जाहीर केलेले ५ हजार कोटी रुपये अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यात जमा न झाल्याबाबत मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले. हमी योजनांसाठी निधी नसल्याने राज्याला ‘मद्यपी राज्य’ बनवण्याच्या दिशेने सरकार जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या पत्रकार परिषदेला भाजप प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके, बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, शहर अध्यक्षा गीता सुतार, माजी आमदार संजय पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.