बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेच्या वतीने दि. २० व २१ डिसेंबर २०२५ रोजी के.पी.टी.सी.एल. समुदाय भवन, शिवबसव नगर येथे आयोजित ६ व्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत कृष्णा देवगाडी याने दमदार कामगिरी करत ‘ओपन चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ हा मानाचा किताब पटकावला.
या स्पर्धेत पंजाब, हरियाणा, दिल्ली, तामिळनाडू, महाराष्ट्र, गोवा यांसह विविध राज्यांतील १२०० हून अधिक कराटेपटूंनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या लढतींमध्ये कृष्णाने उत्कृष्ट कौशल्य, शिस्त आणि आत्मविश्वास दाखवत अव्वल स्थान मिळवले.
या उल्लेखनीय यशाबद्दल कृष्णा देवगाडी याला ₹२५,००० रोख बक्षीस व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्याला प्रशिक्षक निलेश गुरखा यांचे मार्गदर्शन लाभले असून बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर व सचिव जितेंद्र काकतीकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे.
कृष्णा देवगाडीच्या या यशाबद्दल कराटे क्षेत्रातील मान्यवर, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








