- सुमारे ५०० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
बेळगाव / प्रतिनिधी
देव, धर्म आणि समाजसेवेच्या भावनेतून कार्यरत असलेल्या श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने रविवारी सकाळी अनगोळ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
बेळगावातील अनगोळ राजहंस गल्ली येथे आयोजित या रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते, मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. शिबिरात संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने युवकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. आयोजकांच्या माहितीनुसार, सुमारे ५०० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
यावेळी माध्यमांशी बोलताना अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, “गेल्या दहा वर्षांपासून श्रीराम सेना हिंदुस्थानचे हजारो कार्यकर्ते सातत्याने रक्तदान करत असून, जात-धर्म-भाषेचा कोणताही भेद न ठेवता अनेक गरजू रुग्णांना जीवनदान देत आहेत. रक्तदान हा आमच्यासाठी केवळ उपक्रम नसून समाजसेवेची जबाबदारी आहे.”
ते पुढे म्हणाले की, “अलीकडे काही समाजकंटकांनी रक्तदान शिबिराच्या बॅनर व होल्डिंग्जचे नुकसान केले, मात्र हा उपक्रम संपूर्ण समाजाच्या हिताचा असल्याने कोणीही यात वादग्रस्त मुद्दे आणू नयेत.” शेवटी त्यांनी रक्तदान करणाऱ्या सर्व तरुणांचे व रक्तदात्यांचे आभार मानले. या यशस्वी रक्तदान शिबिरामुळे सामाजिक एकोपा आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ झाला.







