- ड्रग्ज निर्मिती करून देशभर पुरविणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
- मुख्य सूत्रधाराला अटक
बेंगळुरू : महाराष्ट्र पोलिसांनी बेंगळुरूमध्ये एमडी ड्रग्ज तयार करून देशभर पुरवठा करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ड्रग्ज निर्मिती करणाऱ्या तीन फॅक्टऱ्या उद्ध्वस्त करण्यात आल्या असून टोळीचा मुख्य सूत्रधार प्रशांत यल्लप्पा पाटील (रा. मालेवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) याला अटक करण्यात आली आहे.

प्रशांत पाटील हा पोलिसांपासून बचावासाठी सतत ठिकाणे बदलत होता. दोन वर्षांपूर्वी चंदगडमधील ड्रग्ज फॅक्टरीवरील छाप्यानंतर तो फरार झाला होता. नंतर तो बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाडोत्री घरात वास्तव्यास असल्याचे तपासात उघड झाले.

महाराष्ट्र पोलिसांच्या एन-एटीएफ पथकाने बेंगळुरूमध्ये अत्यंत नियोजनबद्ध कारवाई करत प्रशांत पाटीलला अटक केली. यावेळी मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज व साहित्य जप्त करण्यात आले असून संपूर्ण नेटवर्क उध्वस्त करण्यात यश आले आहे.
या यशस्वी कारवाईमुळे आंतरराज्य अंमली पदार्थ तस्करीला मोठा धक्का बसला आहे. ड्रग्जविषयक माहिती देण्यासाठी नागरिकांनी ०७२१८०००७३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.









