बेळगाव / प्रतिनिधी
नववर्ष स्वागताच्या जल्लोषावेळी तरुणाईकडून होणारे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आणि वाढते अपघात रोखण्यासाठी बेळगाव पोलिसांनी कडक पावले उचलत पोलिसांनी मद्यपी वाहन चालकांसाठी विशेष नाकाबंदी सुरू केली आहे. राज्य पोलीस मुख्यालय आणि रस्ते सुरक्षा समितीच्या निर्देशानुसार बेळगाव शहरात गेल्या पाच दिवसांपासून ही विशेष मोहीम राबवली जात आहे. केवळ शुक्रवारीच रहदारी पोलिसांनी शहरात नशेत वाहन चालवणाऱ्या १५ जणांना पकडून त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले. २२ ते २६ डिसेंबर या कालावधीत आतापर्यंत एकूण ५७ मद्यपी चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे की, शहरातील मुख्य रस्ते, क्लब्स आणि हॉटेल परिसरामध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात असेल. ब्रेथ अॅनालायझरच्या साहाय्याने प्रत्येक संशयास्पद चालकाची तपासणी केली जाणार आहे.








