• अभिनेते गिरीश ओक यांचे प्रतिपादन

बेळगाव / प्रतिनिधी

“गुगल किंवा एआयकडून मिळणारी माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. ज्ञानासाठी अनुभव, संवेदना आणि विचारशीलता आवश्यक असते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांनी केले. आज सायंकाळी कॅम्प येथील बी.के. मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार संजय पाटील प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी गिरीश ओक पुढे म्हणाले की, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पाच ज्ञानेंद्रियांचा योग्य वापर झाला नाही, तर सहावे इंद्रिय म्हणजे सर्जनशील बुद्धी निष्क्रिय होते. एआय स्वतःहून कलाकृती निर्माण करू शकत नाही किंवा शस्त्रक्रिया करू शकत नाही; त्यामागे माणसाची सर्जनशील बुद्धीच कार्यरत असते. मात्र तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे ही सर्जनशीलता आणि जिज्ञासा मुलांमध्ये कमी होत चालल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.

आजच्या काळात पालक आणि शिक्षकांची जबाबदारी अधिक वाढली असून, मुलांशी संवाद साधणे, बाहेरील जग दाखवणे आणि अनुभवातून शिकण्यास प्रवृत्त करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “मी जे काही आहे, ते माझ्या आई-वडील आणि शिक्षकांमुळेच,” असे नमूद करत त्यांनी बी.के. मॉडेल हायस्कूलच्या शंभर वर्षांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला.

यावेळी माजी आमदार संजय पाटील यांनीही मनोगत व्यक्त करताना, शिक्षणाबद्दल अनास्था असलेल्या काळात बी. के. मॉडेल शाळेची स्थापना करणाऱ्या संस्थापकांचे धाडस आणि शिक्षकांचे योगदान अधोरेखित केले. भाषा संवादासाठी असते, वादासाठी नव्हे, असे सांगत शाळेने “माणूस घडवण्याचे” कार्य केल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी स्वागत केले, तर शेवटी श्रीनिवास शिवणगी यांनी आभार मानले.