• कॅम्प परिसर रोषणाईने उजळला

बेळगाव / प्रतिनिधी

ख्रिस्ती बांधवांचा प्रमुख सण असलेल्या नाताळच्या स्वागतासाठी बेळगाव शहर सज्ज झाले असून, शहरात विशेषतः कॅम्प परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. २५ डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्मदिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसर विद्युत रोषणाई, सजावटी आणि धार्मिक तयारीने न्हाऊन निघाला आहे.

कॅम्प भागात ख्रिश्चन समाजाची संख्या मोठी असल्याने गेल्या आठवड्यापासून चर्च, निवासस्थाने आणि सार्वजनिक ठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. घराघरांत ख्रिसमस ट्री उभारून त्यावर तारे, घंटा, फुगे आणि रंगीबेरंगी दिवे लावण्यात आले आहेत. नाताळनिमित्त बाजारपेठांमध्येही सजावटीच्या साहित्याची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

शहरातील विविध चर्चमध्ये आज २४ डिसेंबर रोजी मध्यरात्री सामुदायिक प्रार्थनेद्वारे प्रभू येशूंचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यासाठी विशेष धार्मिक विधी आणि गायन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अनेक ठिकाणी प्रभू येशूंच्या जन्माचे आकर्षक देखावे उभारण्यात आले असून, नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

नाताळच्या निमित्ताने बेळगावात शांतता, बंधुभाव आणि आनंदाचे वातावरण असून, हा सण सर्व धर्मीय नागरिक एकत्रितपणे साजरा करत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.