बेळगाव / प्रतिनिधी

स्पर्धा, तंत्रज्ञान आणि वेगाने बदलणाऱ्या काळात केवळ गुणांवर भर न देता विद्यार्थ्यांना विचारशील, आत्मविश्वासू आणि जबाबदार नागरिक घडवण्याचे मोलाचे कार्य बी. के. मॉडेल हायस्कूलने गेल्या शंभर वर्षांत केले आहे. याच भक्कम शैक्षणिक पायावर घडलेले विद्यार्थी आज देश-विदेशात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ व कर्नाटक विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. मीना चंदावरकर यांनी केले.

बी. के. मॉडेल हायस्कूलच्या शतक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व सेंद्रिय शेतीतज्ज्ञ के. ई. एन. राघवन यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. चंदावरकर यांनी सांगितले की, शिक्षण ही केवळ पाठ्यपुस्तकांपुरती मर्यादित प्रक्रिया नसून योग्य वातावरण, प्रेरणादायी शिक्षक आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येतो. बी. के. मॉडेल हायस्कूलने ही मूल्याधिष्ठित शिक्षणपरंपरा कायम जपली आहे. इच्छाशक्ती, ज्ञान आणि उत्साह या त्रिसूत्रीवर आधारित शिक्षणपद्धती हीच या संस्थेची खरी ओळख ठरली आहे.

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात मातृभाषेला दिलेले महत्त्व या शाळेने अनेक वर्षांपूर्वीच अमलात आणले असल्याचे त्यांनी नमूद केले. इंग्रजीसह कन्नड आणि मराठी भाषांना समान महत्त्व देत विद्यार्थ्यांना भाषिकदृष्ट्या समृद्ध करण्याचे कार्य शाळेत प्रभावीपणे सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

शाळेच्या शतकपूर्तीमागे शिक्षकांचा त्याग, संचालकांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि संस्थेची मूल्यनिष्ठ परंपरा कारणीभूत असल्याचे सांगत त्यांनी सर्व घटकांचे विशेष कौतुक केले. यावेळी के. ई. एन. राघवन यांनीही शिक्षण व समाज यांच्यातील सुसंवादावर भर देत आपले विचार मांडले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शुक्लांबर पत्तार यांनी स्वागतगीत सादर केले. श्रीनिवास शिवणगी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तर संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी आभारप्रदर्शन केले.