• शुभम शेळके यांचा आरोप

बेळगाव / प्रतिनिधी

कन्नड दुराभिमानी संघटनेच्या एका म्होरक्याने बेळगावमध्ये येऊन मराठी भाषिकांना उघड आव्हान दिले असतानाही त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र, त्याला प्रत्युत्तर दिल्यामुळे मराठी भाषिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ही कर्नाटक पोलिसांची स्पष्टपणे दुटप्पी भूमिका असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी केला.

गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शेळके म्हणाले की,भाषिक तेढ निर्माण करण्याचा पहिला प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. उलट, त्याला प्रत्युत्तर दिल्याच्या कारणावरून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. एवढेच नव्हे, तर माझी गाडी व मोबाईलही अद्याप परत करण्यात आलेले नाहीत.

ते पुढे म्हणाले की, मराठी भाषिकांना वेगळा न्याय लावला जात असून दुराभिमानी संघटनांच्या सदस्यांचे मात्र लांगूलचालन केले जात आहे. माझ्यासोबतच्या कार्यकर्त्यांना धमकाविण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे मराठी भाषिकांची चळवळ संपविण्यासाठी पोलीस प्रशासनच पुढाकार घेत असल्याचे चित्र दिसत आहे.

मराठी भाषिकांचा लढा शांततेच्या मार्गाने सुरू असल्याचे स्पष्ट करताना शेळके म्हणाले की, कोणीही विनाकारण भाषिक वाद उकरून काढण्याचा प्रयत्न केल्यास त्याला योग्य आणि तितकेच ठोस उत्तर दिले जाईल, असा इशाराही यापूर्वी देण्यात आला आहे. यावेळी त्यांनी मागील दोन महिन्यांत पोलीस प्रशासनाकडून झालेल्या कथित त्रासाबाबत सविस्तर माहिती दिली.