• नगरविकासाचा आराखडा लवकरच तयार होणार

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नवा मास्टर प्लान तयार करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या मास्टर प्लानमध्ये शहरासह तालुक्यातील एकूण ५५ गावांचा समावेश करण्यात येणार आहे.

या नव्या आराखड्यानुसार बेळगाव नगरविकास प्राधिकरण (बुडा) कडून ज्या भूभागावर जे आरक्षण निश्चित केले जाईल, तेच आरक्षण अंतिम मानले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना भू-वापर बदलासाठी (लँड यूज कन्वर्जन) करावा लागणारा अनावश्यक खर्च आणि वेळ वाचणार आहे.

या मास्टर प्लानसंदर्भातील विधेयक महसूल मंत्री भैरैगौडा यांनी सादर केले असून, हे विधेयक लवकरच विधानपरिषदेत मंजुरीसाठी मांडले जाणार आहे.

नव्या मास्टर प्लानमुळे बेळगाव शहर आणि परिसरातील गावांच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळणार, तसेच भविष्यातील पायाभूत सुविधा, रस्ते, निवासी व औद्योगिक क्षेत्रांचे नियोजन अधिक सुस्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.