बेळगाव : क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्रीशिक्षणाचे द्वार खुले केले. त्यांच्या या क्रांतिकारी कार्याचा प्रचार-प्रसार, तसेच भारतीय संविधानाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने पुण्यात आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.
संविधानदूत आदरणीय विजय वडवेराव यांच्या पुढाकारातून होणारा हा महोत्सव यंदा दुसऱ्या वर्षात पदार्पण करत असून, पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात या भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी बेळगाव (कर्नाटक) जिल्ह्यातून पाच कर्तृत्ववान महिलांची विशेष निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये अस्मिता आळतेकर, सौ. रोशनी हुंद्रे, प्रा. सौ. शुभदा प्रभू-खानोलकर, प्रा. डॉ. सौ. मनिषा नाडगौडा आणि सौ. पूजा सुतार यांचा समावेश आहे. या पाच जणींना विशेष निवडपत्र पाठवून आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलच्या काव्यजागर विचारमंचावर निमंत्रित करण्यात आले आहे.
या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक कवी-कवयित्री हे त्या-त्या सत्राचे अध्यक्ष असणार आहेत. एकाच कार्यक्रमात शेकडो अध्यक्ष ही समतावादी विचारधारेची साक्ष देणारी आणि जगातील एकमेव ऐतिहासिक संकल्पना मानली जात आहे. तसेच या महोत्सवात सुमारे १,००० संविधान ग्रंथांचे वाटप करण्यात येणार आहे.
चार दिवस चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही भव्य आयोजन करण्यात आले आहे. अशा विचारप्रधान आणि ऐतिहासिक महोत्सवात बेळगावच्या पाच ‘सावित्रीच्या लेकीं’ना संधी मिळणे ही बेळगावकरांसाठी अभिमानाची बाब ठरत आहे.
या निवडीबद्दल बेळगावमधून सर्वत्र या पाचही महिलांचे मनःपूर्वक कौतुक करण्यात येत आहे.







